जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द गावाजवळ भुसावळ जळगाव महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुरुवार, १२ जानेवारी रोजी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. समाधान लक्ष्मण जगदाणे वय ३० रा. साकेगाव ता.भुसावळ असे मयत तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, समाधान जगदाणे हा २८ डिसेंबर 2022 रोजी एम.एच. १९ सी.सी. ९९४७ या क्रमाकांच्या दुचाकीने डॉ उल्हास पाटील रुग्णालयात गेला होता. तेथून काम आटोपून ९ वाजेच्या सुमारास पुन्हा दुचाकीने घरी साकेगावकडे परतत असतांना, भुसावळ जळगाव महामार्गावर कपुर पेट्रोलपंपसमोर समाधान याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात समाधान याचा मृत्यू झाला होता तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळाहून पसार झाला होता. तब्बल १६ दिवसानंतर याप्रकरणी मयत समाधान याचा भाऊ संदीप लक्ष्मण जगदाणे (वय ३४) याने नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक संजय जाधव हे करीत आहेत.