सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणातील १३ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
या संदर्भात वृत्त असे की, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांना कत्तलखान्याजवळ काही मुलांना जमाव मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. यामुळे ते आपल्या दुचाकीवरून तेथे नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी गेले. याप्रसंगी बिलाल कुरेशी, अशफाक कुरेशी व कादीर कुरेशी यांच्यासह सुमारे ४० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला चढविला.
यात जमावाने जितेंद्र भारंबे यांच्यासह इतरांवर लाठ्या-काठ्या आणि तलवारीने हल्ला चढविला. यात त्यांना पिस्तुल दाखवून धमकावण्यात आले. तसेच पिस्तुलीच्या दस्त्याने त्यांना मारहाण झाली. या हल्ल्यात जितेंद्र भारंबे यांच्यासह गणेश देवकर, पंकज चौधरी, पवन महाजन व राहूल पाटील हे जखमी झाले असून तर जितेंद्र भारंबे हे गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी जमावाच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ तसेच आर्म ऍक्ट ३/२५ व ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रारंभी तीन जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शेख बिलाल शेख अयुब कुरेशी,वय-३३, रा.सावदा; शेख कादीर शेख अयुब कुरेशी, वय-२३, रा.सावदा मांगवाडा; शेख साबीर उर्फ बुढा शेख लाल, वय-३९ रा.इस्लामपुरा सावदा; शेख इकबाल शेख गफ्फार, वय-३६ रा.सावदा; शेख आबीद शेख लतीफ, वय-३० रा.सावदा; रमजानखान उर्फ तासीफखान महेबुबखान, वय-२६ रा.सावदा; शेख शाहबाज शेख जमील, वय-२५ रा.सावदा; शेख मुक्तार शेख अरमान, बय-३४ रा.सावदा; शेख कलीम शेख अयुब, वय-३४; अशफाकखान उर्फ अबु असलमखान वय २१ रा खाजानगर; मोईन उर्फ मोयालाला शेख हसन, वय-२७, रा.खाजानगर ; शेख साबीर उर्फ अल्लारखा शेख खलील, वय-३४, रा.चांदणीचौक; मुजम्मीलखान अजगरखान, वय-२२, रा.खाजानगर यांचा समावेश आहे. तर अजून २० जण फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता तसेच सलोखा कायम राखावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.