जळगाव (प्रतिनिधी) शहरातील लक्ष्मण नगर येथील 45 वर्षीय प्रौढाचा रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश पंडित पाटील (वय 45 रा. एसटी वर्कशॉप जवळ लक्ष्मणभाऊ नगर) हे रात्री जेवण करून ९.३० वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता निघाले. त्यानंतर रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी धावत्या गाडीतून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रेल्वे खांब 420/1055 डाऊन लाइन जवळ आढळून आला. याबाबत स्टेशनमास्तर आर.के .पलरेचा यांच्या खबरीवरून जळगाव रेल्वे पोलिसात गुरन नंबर 71/ 2019 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान मयताच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली असून त्यात म्हटले आहे की, ‘मी जात आहे, माझा मोबाईल नंबर आहे’. या चिठ्ठीमुळे नेमके घरुन जात आहे की पळून जात आहे, कींवा जग सोडून जात आहे, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह जिल्हा रूग्णालयात रवाना केला. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास अनिंद्र नगराळे आणि समाधान कंखरे हे करीत आहे.