सावदा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाड्याने घेतलेले दुकान खाली करण्याबाबत विचारणा केली असता एकावर विळ्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, हरेश उर्फ रामा सुभाष होले यांच्या काकांचे दुकान हे किरण प्रभाकर निंबाळे आणि आनंद रवींद्र जगताप या दोघांनी भाड्याने घेतलेले आहेत. हे दुकान ते खाली करत नसल्याने रामा होले यांनी त्यांना याबाबत विचारणा केली. यामुळे किरण निंबाळे यांनी रिक्षातून विळा आणून त्यांच्यावर वार केला. तर आनंद जगताप यांनी त्यांना पकडून ठेवले. या झटापटीत रामा होले यांच्या मनगटाला विळ्याच्या वारामुळे जखम झाली.
ही घटना सावदा शहरातील सर्वज्ञ फर्निचर या दुकानाच्या समोर सायंकाळी सुमारे साडेसहाच्या सुमारास घडली. या अनुषंगाने हरेश उर्फ रामा सुभाष होले (वय ४५, रा. लक्कडपेठ, फैजपूर ) यांनी सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार गुरनं २२४/२०२२ भादंवि कलम ३२६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.