जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावखेडा शिवारात तलाठी यांनी कारवाई केलेले ट्रॅक्टर रस्त्यातून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता टॅक्टरचालक व मालक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील मुंदडा फार्म परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव तालुका महसुल विभागाला मिळाली. त्यानुसार धामणगावचे तलाठी रविंद्र श्रीरंग घुले (वय-३१) यांच्या सह पथकाने शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टरला ट्रॉलीसह पकडले. पंचनामा करून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यासाठी नेत असतांना ट्रॅक्टर चालक नितीन किसन कुंभार आणि ट्रॅक्टर मालक फैजल खान अस्लम खान पठाण दोन्ही रा. पिंप्राळा, वखार जवळ, जळगाव यांनी रस्त्यावरून ट्रॅक्टर पळवून नेले. तसेच तलाठी रविंद्र घुले हे कारवाई करत असतांना त्यांच्या गाडीची चाबी काढून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी तलाठी रविंद्र घुले यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर चालक नितीन किसन कुंभार आणि ट्रॅक्टर मालक फैजल खान अस्लम खान पठाण दोन्ही रा. पिंप्राळा, वखार जवळ, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण पाटील करीत आहे.