सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलीस स्थानकाची धुरा सध्या एलसीबीमध्ये कार्यरत असणारे एपीआय जालींदर पळे यांच्याकडे आली आहे.
सावदा पोलीस स्थानकासाठी कालचा दिवस हा अतिशय दुर्दैवी ठरला. पोक्सो कायद्याच्या अंतर्गत दाखल गुन्ह्याबाबत ठाण्याचे प्रभारी एपीआय देवीदास इंगोले यांनी आपले सहकारी पीएसआय समाधान गायकवाड यांच्या माध्यमातून ६० हजारांची लाच मागितली. यानंतर १५ हजारांवर तडजोड झाली. यातील लाच प्रत्यक्ष स्वीकारण्यात आली नसली तरी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या दोन्ही अधिकार्यांना काल सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने उचलल्याने खळबळ उडाली. यथावकाश या दोन्ही अधिकार्यांच्या विरोधात दुपारी गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलीस ठाण्याच्या प्रमुखालाच अटक करण्यात आल्याने त्यांच्या जागी कोण येणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. या अनुषंगाने रात्री उशीरा सध्या एलसीबीमध्ये कार्यरत असणारे एपीआय जालींदर पळे यांच्याकडे सावदा येथील प्रभार देण्यात आला आहे. त्यांनी रात्रीच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला आहे.