अमेठी (वृत्तसंस्था) अमेठीच्या नवनिर्वाचित खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. स्मृती इराणी स्वत: सिंह यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रविवारी दिल्लीहून अमेठीत आल्या. भावूक झालेल्या स्मृती यांनी सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन त्यांच्या पार्थिवाला खांदाही दिला. सिंह यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेदरम्यान राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदारही उपस्थित होते. सुरेंद्र यांच्या कुटुंबियांनी त्यांची हत्या राजकीय वादातून झाली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सिंह यांचा मुलगा अभय म्हणाला, ‘स्मृती इराणी यांच्या विजयानंतर आम्ही जल्लोष करत होतो, ते अनेक काँग्रेस समर्थकांना आवडले नाही.’ शनिवारी रात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांनी सुरेंद्र सिंह यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली. घराच्या अंगणात झोपलेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.