चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बोढरे-शिवापूर शिवारात असणार्या दोन सोलर कंपन्यांच्या परिसरात शिरून शेतकरी बचाव कृती समितीच्या सदस्यांसह परिसरातील महिला व पुरूषांनी सोलर पॅनल तसेच अन्य सामग्रीची नासधूस केल्याने आंदोलक स्त्री-पुरूषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील बोढरे-शिवापूर शिवारात जेबीएम सोलर एनर्जी महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड आणि आवादा या दोन सोलर कंपन्या आहेत. या कंपनीने परिसरातील शेतकर्यांकडून कायदेशीर पध्दतीत जमीनी खरेदी केल्या आहेत. तथापि, आपल्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आल्याचा शेतकर्यांचा आरोप आहे. या प्रकरणी शेतकरी बजाव कृती समिती स्थापन करून अनेक आंदोलने करण्यात आली आहे. यामध्ये अगदी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र तेथे देखील कुणी दखल न घेतल्यामुळे अलीकडेच दोन्ही प्रकल्पांच्या परिसरात दिनांक ७ ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू होते. यातील पहिल्या चार दिवसांमध्ये आंदोलकांनी अगदी भर पावसातही आपण्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले. मात्र याची देखील कुणीही दखल घेतली नाही.
आंदोलकांनी आपण आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सोमवारीच सांगितले होते. यानंतर, मंगळवार दिनांक ११ रोजी दुपारी हे आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी उंच टेकडीवर जाऊन एक भला मोठा दगड खाली सरकवल्याने जेबीएम कंपनीची संरक्षण भिंत तुटली. यातून आंदोलक महिला आणि पुरूषांनी हातात कोयता, लोखंडी रॉड आदी घेऊन तोडफोड सुरू केली. दोन्ही कंपन्यांमध्ये याच प्रकारे तोडफोड करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी जेबीएम सोलर एनर्जी महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेडचे सहायक व्यवस्थापक कैलास विठ्ठलराव घुगे यांनी चाळीसगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यात शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भीमराव जाधव यांनी चिथावणी देऊन कंपनीत तोडफोड करून चोरी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारात कंपनीच्या मालकीच्या ९६ हजार रूपयांच्या प्लेट चोरून नेतांनाच ५६ लक्ष ४० हजार रूपयांच्या सोलर पॅनलचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. तर आवादा कंपनीतही ३८ लक्ष रूपयांच्या सोलर पॅनलची चोरी झाली असून ६५ हजार ५०० रूपयांची सामग्री चोरून नेल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात भादंवि कलम ३९५, ३९७, १२०-बी, ४२७, १०९, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष अध्यक्ष भरत चव्हाण व सचिव भीमराव जाधव यांच्यासह लिंबा ओंकार राठोड, पुंडलिक मदन राठोड, नवनाथ मदन राठोड, कडू महादू राठोड, सुनील सिताराम चव्हाण आदींसह एकूण ४५ पुरूष व महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सीसीटिव्हीत सुमारे १० ते १२ जणांची ओळख पटली असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.