जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी : जिल्हा मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानात शतपावली करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला अज्ञात चोरट्याने चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची चैन जबरी हिसकावून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, आरती मोतीलाल कुमावत (वय-३२) रा. पोलीस सोसायटी, जिल्हा पोलीस मुख्यालय जळगाव ह्या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी म्हणून नोकरीला आहे. गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानात शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या. पोलीस कवायत मैदानात दुसरी फेरी मारत असतांना अंधाराचा फायदा घेत निंबाच्या झाडाजवळून एक अनोळखी चोरटा तोंडाला काळारूमाल बांधून त्याच्या मागावर आला. त्याला पाहून आरती कुमावत ह्या पळत सुटले. चोरट्याने त्यांचा पाठलाग करून त्यांचा रस्ता आडविला. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावत होता. त्यावेळी महिलेने त्यांच्या तोंडावरील रूमाल ओढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात चोरट्याने हातात चाकू दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चैन जबरी हिसकावून त्यांना जखमी करत पसार झाला. यात झटापटीत त्यांची अर्धी चैन तुटलेली गळ्याजवळून आढळून आली. यासंदर्भात आरती कुमावत यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चंदेलकर करीत आहे.