जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अपघात झाल्याने गंभीर होऊन अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णाला शस्त्रक्रिया करून त्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात अस्थिव्यंगोपचार विभागाला वैद्यकीय कौशल्याच्या बळावर शक्य झाले आहे. याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कौतुक केले आहे.
धानोरा ता. चोपडा येथील श्रीराम रुपसिंग बारेला हा मूळ मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. त्याचा अपघात झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अस्थिव्यंगोपचार विभागाच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली असता, त्याच्या डाव्या खुब्याला जबर मार लागलेला होता. खुबा निखळून मोठ्या टीचा पडलेल्या होत्या. तसेच उजव्या गुडघ्याच्या हाडाला देखील मार होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ दिवस अतिदक्षता विभागात यशस्वी उपचार झाल्यावर त्याला साधारण वॉर्डात दाखल करण्यात आले होते.
श्रीराम बारेलावर खुब्याची २, तर उजव्या गुडघ्याची १ अशी तीन शस्त्रक्रिया करून त्यांचा खुबा वाचवून जीव वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले. या रुग्णाकडे सरकारी कागदपत्रे मिळत नव्हती, मात्र तरीही त्याच्यावर उपचार पूर्ण करून पूर्ववत करण्याचे यशस्वी प्रयत्न करण्यात आले. या रुग्णाला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
त्याच्यावर उपचार करण्यासाठी अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. पंकज घोगरे, डॉ. शंतनू भारद्वाज, डॉ. महेश देशमुख, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. गोपाळ डव्हळे, डॉ. प्रणव समरुतवर, डॉ. सचिन वाहेकर यांच्यासह बधिरीकरण विभागाचे डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. ऋतुराज काकड, अधिपरिचारिका निला जोशी, रुपेश कासार आदींनी परिश्रम घेतले.