Home क्राईम पिंप्री येथे चोरांचा धुमाकूळ : रात्रीत पाच चोऱ्या

पिंप्री येथे चोरांचा धुमाकूळ : रात्रीत पाच चोऱ्या


download 6

पिंप्री खुर्द, तालुका धरणगाव (प्रतिनिधी) गावात आज पहाटे ३.०० च्या सुमारास चोरांनी मोठा धुमाकूळ घालून पाच ठिकाणी चोर्‍या केल्याची घटना घडली. एकाच दिवशी झालेल्या पाच घरफोड्यांमुळे पिंप्री तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

अयोध्या नगरात सुभाष पुंडलिक शिंदे तसेच रामेश्वर आंधळे यांच्या घरात आधी चोरांनी डल्ला मारला व तिथेच न थांबता चोरांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला.
भरवस्तीत असलेले श्री समर्थ कृपा ज्वेलर्स हे दुकान फोडून साधारणत दीड लाखांचे सोने-चांदीचे दागिने घेऊन चोरांनी तेथून पोबारा केला. रस्त्यावर असलेल्या डाक ऑफिसमधून तिजोरीतून सुमारे १६ हजारांची रक्कम चोरून नेली. ही तिजोरी चोरांनी उचलून अंजनी नदीकाठावर फेकली होती. याशिवाय समर्थ कलेक्शनमधून रेडीमेड ड्रेस व लहान मुलांचे ड्रेस व इतर कपडे असा सुमारे ४० हजारांचा माल चोरून नेला.

सदर घटनेची माहिती धरणगाव पोलीस स्टेशन येथे कळवण्यात आल्यानंतर तेथील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे तसेच पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी व पंचनामा केला. तसेच चोपडा येथील पोलीस उपाधीक्षक सौरभ अग्रवाल यांनीही तात्काळ घटनेची पाहणी करून जळगाव येथील श्वानपथकाला पाचारण केले . पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. सय्यद करीम, नाना ठाकरे व त्यांचे सहकारी करत आहेत. तरी पोलिस निरीक्षकांनी संबंधित घटनेचे तात्काळ चौकशी करावी व चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound