जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील हिवाळी २०२२ च्या विविध वर्गांच्या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा दिर्घोत्तरी पध्दतीने आयोजित करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा दिर्घोत्तरी पध्दतीने घेण्याचा निर्णय झाला. कोविड १९ च्या प्रादूर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी पध्दतीने परीक्षा घेण्यात येत होत्या. आता कोविडचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे पूर्वीप्रमाणे या परीक्षा होणार आहेत. त्या दृष्टीकोनातून विद्यापीठाने तयारी सुरु केली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी दिली.