पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील निपाणे गावात मानवतेला काळिमा फासणारी घटना लोकप्रतिनिधीच्या हातून घल्यानेड समाज मन सुन्न झाले आहे. अशा समाजकंटक लोकप्रतिनिधींचा आणि घडलेल्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. घटनेतील संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात येवून कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करत मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आज शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष शुभम पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष सागर पाटील, शहर अध्यक्ष ऋषीकेष भोई, शहर संघटक हर्षल अहिरे, उप शहर अध्यक्ष यश रोकडे, ज्ञानेश्वर ठाकरे, शहर सरचिटणीस श्रीकृष्ण दुंदुले, प्रशांत पाटील, गोपाल नाईक, दिपक ठाकरे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याविषयी अधिक माहिती देतांना मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ म्हणाले की, “रविवार, दि.११ सप्टेंबर रोजी सुरत येथे निपाणे ता. पाचोरा येथील निलाबाई वामन धनुर्धर या ६७ वर्षाच्या आजीचे निधन झाले. गाव व नातेवाईक निपाणे ता. पाचोरा येथे असल्याने त्यांचा अंत्यविधी निपाणे गावात करण्याचा निर्णय घेतला गेला. अंत्यविधी रात्री १०.३० वाजता करणार असल्याने व पावसाचा जोर जास्त असल्यामुळे जिल्हा परिषदेने बांधून दिलेल्या स्मशान भूमीत अंत्यविधी करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला.
अंत्यविधीची तयारी सुरु असतांना अंत्यविधी स्मशान भूमीत करु नये. यासाठी काही लोकांनी विरोध केला. माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गिरधर पाटील व गावचे सरपंच घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यास विरोध करण्यात आला. शरमेची बाब म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील तसेच सरपंच यांचा पुढाकर दिसून आला. विरोध टोकाचा जावून अनेक वेळा विनविण्या करून माणुसकीचा दाखला देवूनदेखील काही उपयोग झाला नाही. शेवटी स्मशान भूमीच्या बाहेर भर पावसात अंत्यविधी करण्यात आला.
या घटनेने समाज बांधवांचे मन सुन्न झाले आहे. मृत्यू नंतरही गावाच्या स्मशान भूमीत सन्मानाने विसावा देखील या राजकारण्यांमुळे मिळाला नाही. या संदर्भात पाचोरा पोलीस स्टेशनला जिल्हाप्रमुखांसह ११ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आजपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. काही आरोपी गावात फिरतांना आढळून आले जसा कायद्याचा धाकच उरला नसल्याची स्थिती निर्माण झाली” असल्याचे अनिल वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संबंधित आरोपींना आठ दिवसांच्या आत अटक न झाल्यास मनसे पाचोरा पोलीस स्टेशनसमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही यावेळी अनिल वाघ यांनी दिला.