नाडगाव ता.बोदवड (वार्ताहर) येथील धरम मळा वस्तीत आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास बोदवड भागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अचानक फुटल्याने लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेले. काही दिवस आधीच देखील आमदगाव रोडाने पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर शुद्ध पाणी हे वाया जातांना दिसून आले होते. ऐकीकडे लाखो लिटर वाया जातेय तर दुसरीकडे दोन्ही गावातील महीला पाण्यासाठी भटकंती करावी लागत भीषण चित्र आहे.
यंदा महाराष्ट्र सरकारकडून बोदवड तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन जाहीर झाले आहेत. बोदवड तालुक्यात गेल्या पाच ते सहा वर्षापासुन समाधानकारक पाऊस पडलेला नाही. तसेच गेल्या चार वर्षापासून सलग दुष्काळाची झळ बोदवड तालुक्याला बसतेय. गेल्या पाच वर्षापासून पावसाने दांडी मारलेली आहे. तर यंदाही उन्हाळयात पाण्यासाठी सर्वाचीच वणवण झाली आहे. तालुक्यात कुठल्याही जलसिंचन योजना नसल्याने विहिरींच्या भुजल पातळ्या अतिशय खोलवर गेलेल्या आहेत. जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळ निवारण पथकाचेही सातत्याने दुर्लक्ष दिसत असून पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडुन किती टँकर पाठवले जातात यावरही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. एकाही शासकिय अधिकाऱ्याने परिसराला भेट न दिल्याने नागरिकांत तिव्र नाराजी आहे. नाडगाव व नादंगाव येथे गेल्या महिन्यातून एकच वेळा नळ येत असल्याने नागरिकांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत. गुरांच्या हौदातीलही पाणी गावकरी दैनंदिन वापरासाठी नेत असल्याने पाणीप्रश्न हि एक गंभीर समस्या बनली आहे. गावातील ग्रामपंचायत परिसरात एक मोठा गुरांचा हौद आहे. परिसराला लागुन गावातील चार वार्डांपैकी १ ,२ हे दोन वार्ड आहेत.गुरांचा हौद भरण्यासाठी ओडिओचे पाणी सोडले जाते. पण , पाणी सोडताच हौदातील पाणी हे धुने भांडे करण्यासाठी वापर होतो. दैनंदिन वापरासाठी नेत असल्याने गंभीर पाणीटंचाईबाबत हा चिंतेचा विषय बनलाय. ‘पाण्याने आपली किंमत काय असते’ हे सर्वाना दाखवून दिले. शासनाच्या योजना या फक्त कागदावरच दिसून येतात.