जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध निर्बंधांमध्ये साजरा झालेला गणेशोत्सव यंदा अतिशय उल्हासात आणि जल्लोषात तसेच कोणत्याही आडकाठीशिवाय साजरा होत आहे.
कोविडच्या आपत्तीमुळे २०२१ सालचा गणेशोत्सव कठोर निर्बंधांमध्ये साजरा झाला होता. गेल्या वर्षी देखील काही प्रमाणात नियम आणि अटी टाकण्यात आलेल्या होत्या. यंदा मात्र कोणत्या प्रकारचे निर्बंध नसल्याने गणेशोत्सव हा आधीप्रमाणेच अतिशय उल्हास आणि जल्लोषात साजरा होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. यानुसार, आज सकाळपासून गणेश स्थापनेची लगबग सुरू झाली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र आज गणरायाचे आगमन होत आहे. सार्वजनीक मंडळे, घर, कार्यालये, विविध आस्थापना आदी ठिकाणी गणेशस्थापना करण्यात येत आहे. ढोल-ताशांच्या गजरावर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ताल धरून अतिशय उल्हासात गणेशाची स्थापना केली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत ठिकठिकाणी श्री गणेश स्थापना होणार असून याचा चैतन्यदायी माहोल हा सकाळपासूनच बनल्याचे दिसून येत आहे.