जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन बी.जे.मार्केटमधील कौटुंबिक न्यायालयात मदतीसाठी धावून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला एकाने कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन भावांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतिष दिनेश बारसे (वय-२७) व अमित दिनेश बारसे (वय-३०) दोन्ही रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव असे दोन्ही आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बापुराव पिरा मोरे (वय ४६) हे शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. सोमवारी २९ ऑगस्ट रोजी आरटीपीसी ऑनड्यूटी असतांना त्यांना ११२ क्रमांकावरून कॉल आला. त्यानुसार बापूराव मोरे व सहकायरी अय्युब पठाण हे शासकीय वाहनाने नवीन बी.जे. मार्केटमधील कौटूंबिक न्यायालयात गेले. त्यावेळी कॉल करण्याचे कारण विचारले असता कॉल करणारे राजेश पाटील त्यांची भाची गायत्री मच्छींद्र पाटील, रवींद्र भिका पाटील, बहिण दीपाली मच्छींद्र पाटील (सर्व रा.विखरण, ता.एरंडोल) हे उभे होते. गायत्री हिचा न्यायालयात पती आतिष दिनेश बारसे याच्यासोबत घटस्फोट झालेला आहे. त्यामुळे चिडून आतिष हा बहिण दिपाली हिच्या अंगावर धावून आला तर चुलत मेहुणे रवींद्र पाटील यांना मारहाण केल्याचे राजेश पाटील यांनी पोलिसांना सांगितले. त्यावर मोरे यांनी तुम्हाला पोलिसात तक्रार द्यायची आहे का? नसेल तर खाली सोडतो असे सांगितले. आतिष बारसे याने पोलीसात तक्रार द्यायची तयारी दर्शविल्याने या सर्वांना पोलीस वाहनात बसविले. त्यानंतर आतिष बारसे याने उजव्या बाजुचा दरवाजा जोरात उघडून गायत्री पाटील हिला हात धरुन बाहेर ओढले. त्यावर बापूराव मोरे यांनी सरकारी वाहनाचा दरवाजा का उघडला?, असा जाब विचारला. यानंतर आतिष बारसे याने पोलीस कर्मचारी मोरे यांच्या कानशिलात लगावली. त्याचा भाऊ अमित याने देखील या पोलिसांशी धक्काबुक्की केली. यावेळी शहर पोलीव ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना मदतीसाठी बोलावून घेण्यात आले. याप्रकरणी बापुराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आतिष दिनेश बारसे (वय-२७) व अमित दिनेश बारसे (वय-३०) यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.