जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुजरात राज्यात खून, दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रायपूर कुसुंबा येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सुनील उर्फ सल्या लक्ष्मण पाटील (वय 35) रा. बालाजी शाळा जवळ,अशोक नगर, पारोळा असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पारोळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी व गुजरात राज्यात खुनासह दराडे टाकून धुमाकूळ घालणारा शिक्षा भोगत असलेल्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार सुनील उर्फ सल्या लक्ष्मण पाटील हा जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजयसिंह पाटील, महेश महाजन, भगवान पाटील, नितीन बाविस्कर, किरण धनगर, परेश महाजन प्रशांत ठाकूर यांना संशयित आरोपीला अटक करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शनिवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी संशयित आरोपी सुनील उर्फ सल्या लक्ष्मण पाटील याला रायपूर कुसुंबा येथून अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्याला पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.