बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास होण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी गुरांचा गोठा अनुदान योजना पंचायत समिती कार्यालयात विविध अडचणींच्या विळख्यात सापडलेली असून या प्रकरणांवरुन नगराध्यक्षांनी कार्यक्रम अधिकाऱ्याला फटकारले.
शेतकर्यांनी अर्ज करुनही लाभ मिळण्यासाठी शेतकर्यांची अडवणूक होत असून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे यांच्या विचित्र वागण्याचा शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रोहयो विभागात लाच खोरीने पुन्हा डोके वर काढले असुन ग्रामसेवकासहित गटविकास अधिकारी काथेपुरी यांचे असलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय बनलेला आहे.
वराड येथील शेतकरी यांनी गुरांच्या गोठ्याचे प्रकरण जुलै 2021 पासुन पंचायत समिती कार्यालयात दाखल केलेले आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी सदरिल शेतकरी पंचायत समिती कार्यालयातील रोहयो विभागाच्या कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे यांना भेटल्यावर अडीच तास शेतकर्याला ताटकळत ठेवत त्यांच्या उर्मट बोलण्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्रस्त शेतकर्याच्या पुत्राने नगराध्यक्ष आनंदा पाटिल यांना सदरील प्रकार कळविल्यानंतर ते नगरसेवक गोलु बरडिया व इतर शिवसैनिकांसहित घटनास्थळी हजर झाले.
यावेळी प्रकरणांच्या फाईलीच गायब झाल्याचे निदर्शनास आले. तसेच कामात दिरंगाई करणार्या सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला खडे बोल सुनावत गटविकास अधिकारी काथेपुरी यांना सदरील प्रकार लक्षात आणुन दिल्यावर कामात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला.
यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटिल, नगरसेवक गोलु बरडिया, प्रकाश पाटिल, दिपक माळी, अमोल व्यवहारे, सचिन राजपुत, गजानन बेलदार, नितिन शिमरे, सुनिल पाटिल यांच्यासहित अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.