भुसावळ (प्रतिनिधी) यावर्षी हतनूर धरणात दोन टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्यामुळे भुसावळातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची करावी लागत आहे. पोलिस वसाहतीत गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेला हातपंप उपविभागीय पोलीस अधिकारी व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पुढाकार घेतल्यामुळे तो सुरू करण्यास यश आले आहे.
येथील पोलीस वसाहतीत अनेक वर्षांपासून हा हातपंप बंद अवस्थेत होता. या ठिकाणी राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला पाण्यासाठी भटकंतीची वेळ आल्याने व पुढेही येणारी परिस्थिती ही दुष्काळी असल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांनी पुढाकार घेऊन बंद पडलेला हातपंप सुरू करून त्याला मोटार बसवून पोलीस वसाहतीचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी बोअरवेलचे बटन दाबून उद्घाटन केले, यामुळे पोलीस वसाहतीतील पाण्याचे संकट दूर झाले आहे. एएसआय तस्लिम पठाण, एएसआय युवराज नागरुत, राजु परदेशी, कादर तडवी, छोटू वैद्य व पोलीस कर्मचाऱ्यांनी हातपंप सुरू करण्यासाठी सहकार्य केले.