सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गारबर्डी येथील सुकी नदीवरील धरणाच्या पाण्यात अडकून पडलेल्या नऊ पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अतिशय मेहनतीने रात्री उशीरा त्यांची येथून सुटका करण्यात आली आहे.
ससविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एक अलर्ट जारी केला होता. यात रावेर तालुक्यातील सुकी नदीवर असलेल्या गारबर्डी धरण अचानक ओव्हरफ्लो झाल्यामुळे येथे नऊ पर्यटक अडकून पडल्याची माहिती देण्यात आली होती.
पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून पाण्याचा प्रवाह जर वाढला तर ते वाहून जाण्याची भिती होती. या अनुषंगाने धुळे येथून एसडीआरएफचे पथक बोलवण्यात आले होते. सोबतच रावेरच्या तहसीलदार, नायब तहसीलदार, सावदा येथील पोलीस पथक आदी देखील सुकी धरण परिसराकडे पर्यटकांच्या मदतीसाठी रवाना झाले होते.
दरम्यान, रात्र असल्याने मदत कार्य करण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र अखेर रात्री साडेनऊच्या सुमारास प्रयत्नांची शर्थ करून या नऊच्या नऊ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी तहसीलदारा यांच्यासह तालुका प्रशासन, पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन, परिसरातील नागरिक आदींचा मोलाचा वाटा असल्याने हे रेस्न्यू ऑपरेशन सुखरूपपणे पार पडले. नायब तहसीलदार श्री तायडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.