अमळनेर-गजानन पाटील, लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | इंदूरहून घरी येण्याची हुरहूर लागलेल्या तरूणाने व्हाटसअपच्या स्टेटसवर आपण गावी येत असल्याचे मोठ्या उत्सुकतेने नमूद केले. मात्र आज झालेल्या भीषण अपघातात त्याचा करूण अंत झाल्याने हे ‘स्टेटस’ त्याचे शेवटचे ठरले आहे. पाडळसरे येथील अविनाश संजय परदेशी याच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळला आहे.
इंदूरहून अमळनेरला येणार्या बसला नर्मदा नदीत जलसमाधी मिळाल्याने १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. यातील आठ मृतदेहांची ओळख पटली आहे. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हे वृत्त तालुक्यात वार्यासारखे पसरताच सर्वांना एकच धास्ती लागली ती यात आपला कुणी आप्त तर नसेल ना ? याचीच !
याच अपघातात पाडळसरे ता.अमळनेर येथील अविनाश संजय परदेशी हा देखील प्रवास करत असल्याने त्याच्या घरच्यांचा जीव टांगणीला लागला होता. त्याच्या मृत्यूची वार्ता येऊन धडकताच परिसरात एकच शोकलहर उसळली. पाडळसरे ता अमळनेर येथील अविनाश परदेशी (वय- अंदाजे २४ ) हा अलीकडेच इंदोर येथे स्थायिक असलेल्या मावशीकडे आपल्या लहान भाऊ अजय याच्या वाढदिवसनिमित्त गेला होता. नेमका आज अविनाश याच बसने परत गावी येण्यासाठी निघाला आणि आपल्या कडे असलेल्या मोबाईलवर त्याने मराठीत वाय टू पाडळसरे असे टेट्स ठेवत प्रवासाला सुरुवात केली.मात्र नियतीला वेगळंच मान्य असेल की काय?या अपघातात त्याच्यावर देखील झडप घातली आणि,त्याच्या मोबाईल वरील ते टेट्स अखेरच टेट्स ठरलं.
दरम्यान, अविनाशच्या अकाली एक्झिट ने संपूर्ण पंचक्रोशीतील जनसमुदाय शोकमग्न झाले आहेत. अविनाश ची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, कळमसरे येथे तो कपड्यांना इस्त्री करून उदरनिर्वाह करीत होता. अविनाश गेल्या १० वर्षे झाली आजोबांचा धोबी व्यवसाय सांभाळत परिसरातील ८ ते १० खेड्यात कपडे इस्त्री करून घरोघरी सेवा सुरू केल्याने तो पाडळसरे गावातील घराघरात व परिसरात परिचित होता .इंदूर अमळनेर बसच्या अपघातात अविनाशच्या मृत्यूची वार्ता कळताच गावावर शोककळा व स्मशान शांतता पसरली , त्याच्या पश्चात्य वृद्ध आजी व अर्धांगवायू झालेले आजोबा, आई व लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला असून व्हाटसअप स्टेटसच्या माध्यमातून त्याने व्यक्त केलेली इच्छा अपूर्ण राहिल्याने हुरहूर व्यक्त होत आहे.