यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जितेंद्र रवींद्र सरोदे यांची महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष सुनिल देवरे यांनी यासंदर्भात नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र देत त्यांचे अभिनंदन केले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध शासकीय विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणेकामी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सेवा, मार्गदर्शन, सहकार्याची भावना आणि महाराष्ट्रात चांगला जनसंपर्क जितेंद्र सरोदे यांचा आहे. त्यांच्या या कार्यात अधिक भर पडावी याकरिता आपल्या कार्याची दखल घेत आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष या पदावर आपली नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेला मजबूत करण्यासाठी संघटनेच्या ध्येय, धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गापर्यंत पोहचवून गाव तेथे शाखा या आपल्या संघटनेच्या अभियाना अंतर्गत प्रत्येक गावात संघटनेच्या शाखांची स्थापना करावी. अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांनी अभिनंदन केले आहे.