जळगाव,(प्रतिनिधी) सध्या कडाक्याच्या उन्हामुळे सर्वजण कासाविस झालेले असतांना सर्वांनाच गारेगार खावे-प्यावेसे वाटते. या पार्श्वभूमिवर, शेफ हर्षाली चौधरी आपल्याला विविध मॉकटेल्स कसे बनवितात, ते सांगणार आहेत. यात हर्षाली यांच्या मदतीला आहेत बारटेंडर गोवी ! या मालिकेत आजच्या भागात पहा ‘व्हर्जीन पिनाकोलाडा’ मॉकटेलची माहिती…
परिवारासह असो वा मित्र मंडळींसह हॉटेलमध्ये जेवायला गेलो की, आम्ही सूप, स्टार्टर, मेन कोर्स आणि डेझर्ट अशी सगळी साग्रसंगीत ऑर्डर देतो ! त्यात ग्रुप-मधून एखादा कुणीतरी नक्कीच मॉकटॆलची आठवण काढतोच… जणू काय काहीतरी सुर्र्प सुर्र्प केल्याशिवाय घासच गिळता येणार नाही ! हे मॉकटॆल इतक्या सुंदर रंगसंगतीत सर्व्हरच्या हातातल्या ट्रे-मध्ये बसून मुरडत टेबलावर विराजमान होते की आपण त्याकडे बघतच राहतो…! असेच एक लोकप्रिय मॉकटॆल आहे,
“पिनाकोलाडा” ! पिनाकोलाडा या शब्दाचा अर्थ स्पॅनिश भाषेत strained pineapple म्हणजेच “अननसाचा रस” असा होतो. या नावाचे मॉकटॆल खूप प्रसिद्ध आहे, त्यात व्हाईट रमचा वापर केला जातो ! जेव्हा पिनाकोलाडा मधून मदिरा वजा होते, तेव्हा त्याला “व्हर्जिन पिनाकोलाडा” म्हणतात. या पेयाचा इतिहास फारच रंजक आहे. पुएर्तो रिको नावाचा कॅरिबियन समुद्री बेटसदृश एक देश आहे. १८०० शतकात तिथल्या रॉबर्टो कॉफरेसी नामक समुद्री चाच्यांच्या नायकाने आपल्या टोळीला प्रोत्साहित करण्यासाठी ह्या पेयाचा शोध लावला होता, असे काही लोककथांत म्हटले आहे. पुढे १८२५ च्या सुमारास त्याला पकडून मृत्युदंड ठोठावण्यात आला. त्यानंतर ह्या पेयाची पाककृतीही काही वर्षे काळाच्या पडद्याआड गेली होती. अशा बऱ्याच कथा पिनाकोलाडाविषयी ऐकण्यात आल्या आहेत. पुएर्तो रिको या देशात हे पेय सध्या इतके लोकप्रिय आहे की, तिथे १० जुलै हा दिवस ‘नॅशनल पिनाकोलाडा डे’ म्हणून साजरा केला जातो ! किती मजेदार आहे ना !
आत आणखी एक गम्मत म्हणजे आपण हॉटेलात पितो ना अगदी तसे…किंबहुना त्याहीपेक्षा चांगले…असे ‘व्हर्जिन पिनाकोलाडा’ आपण घरी बनवू शकतो, ते पण व्हाईट रमचा वापर न करता…! चला तर मग ‘व्हर्जिन पिनाकोलाडा’ बनवायच्या तयारीला लागुया..! चला मग… घ्या पटकन पिनाकोलाडासाठी लागणारे साहित्य, कोकोनट मिल्क, पायनापल ज्यूस, व्हॅनिला आईस्क्रीम आणि बर्फाचे तुकडे…आणि हो…याच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी ‘लाईव्ह ट्रेंडस् न्यूज’ला नियमीत भेट देत राहा.