धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.लीलाधर बोरसे यांच्या रुग्णालयाची काही तरुणांनी बुधवारी रात्री तोडफोड केल्याप्रकरणी चार जणांसह काही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात नर्स प्रतिभा शिरसाठ (रा.गौतम नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, येथील रामदेव बाबा नगरमधील पूजा कार्तिक करोसिया (वय २६) या गर्भवती महिलेची मागील ६ महिन्यापासून डॉ.बोरसे यांच्याकडे तपासणी सुरु आहे. दी.१५ मे रोजी सकाळी ११ वाजता पूजा आपल्या पतीसह तपासणीसाठी रुग्णालयात आली. यावेळी डॉ.बोरसे यांनी त्यांना सोनोग्राफी करण्यास सांगितले. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कार्तिक किरोसिया हे पुन्हा आपली पत्नी व आईसह दवाखान्यात आले. यावेळी डॉ. बोरसे यांनी रिपोर्ट तपासून सांगितले की, बाळ पोटातच मयत झाले आहे. त्यामुळे तुम्ही तत्काळ जळगाव येथे घेऊन जा. कारण आज सायंकाळी मी परिवारासह दिल्ली येथे जात आहे. त्यानुसार ते निघून गेले. त्यानंतर डॉ.बोरसे यांनी कर्मचारींचे पगार देण्यासाठी १० हजार रुपये टेबलात ठेवले.
रात्री साधारण साडे दहा वाजेच्या सुमारास कार्तिक किरोसिया,संदीप किरोसिया,राजू किरोसिया, अमोल परदेशी व इतर काही अज्ञात लोकं दवाखान्यात घुसले. त्यानंतर त्यांनी डॉ.बोरसे यांच्या कॅबीनची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यांच्यातील एकाने टेबलात ठेवलेले १० हजार रुपये काढून घेतले. त्यांना मी रोखण्यासाठी गेली असता मला देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. यावेळी महेश पाटील,छोटू जाधव,योगेश वाघ यांनी सर्वाना समजविण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर सर्वजण शिवीगाळ करत निघून गेले. पोटात बाळ मेल्याच्या रागातून सर्वांनी तोडफोड केली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ.बोरसे हे धरणगावात परत आल्यानंतरच अधिकची माहिती मिळू शकणार आहे.