जळगाव प्रतिनिधी | सिंधी कॉलनीत संत हरदासराम बाबा यांच्या दर्शनासाठी छत्तीसगड येथून आलेले भाविक राजकुमार नंदलाल लालचंदाणी यांच्या पत्नीच्या पर्समधून मार्च महिन्यात अज्ञात चोरट्याने दोन हजार रूपयांची रोकड चोरून नेली होती.याप्रकरणात बुधवारी गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी संशयित चोरटा भारत अनिल कुकरेजा (रा.बाबानगर, सिंधी कॉलनी) याला अटक केली आहे.
छत्तीसगडमधील विलासपुर येथील रहिवासी राजकुमार लालचंदाणी हे २४ मार्च रोजी कुटूंबीयांसह शहरातील सिंधी कॉलनी येथे संत हरदासराम बाबा यांच्या दर्शनासाठी आले होते.त्यामुळे ते संत हरदासराम साहेब मंदिराच्या मागील धर्मशाळेतील खोली क्रमांक ७ मध्ये थांबलेले होते.दरम्यान, २७ मार्चच्या पहाटे राजकुमार यांच्या पत्नी दर्शनासाठीच निघून गेल्या होत्या़ त्यामुळे त्या खोलीचे दार उघडे होते़ सुमारे पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास राजकुमार यांना जाग आल्यानंतर त्यांना कुणीतरी व्यक्ती त्यांच्या खोलीतून पळताना दिसून आला. त्यांना चोर असल्याची खात्री झाल्यानंतर पत्नीच्या पर्समधून दोन हजार रूपये चोरीला गेल्याचे दिसून आले. हा प्रकार त्यांनी सकाळीच समाजसेवक अशोककुमार मंधान यांना सांगितली. नंतर मंदिर व धर्मशाळा आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक लाल टीशर्ट घातलेला तरूण पळताना त्या फुटेजमध्ये कैद झाला होता.
अखेर दीड महिन्यानंतर बुधवारी समाजसेवक अशोक मंधान यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. नंतर पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात दिले. फुटेज तपासल्यानंतर तो चोरटा भारत अनिल कुकरेजा असल्याचे समोर आले. तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह रामकृष्ण पाटील, नीलेश भावसार, नीलेश पाटील, विजय बावस्कर, सदानंद नाईक यांनी सिंधी कॉलनी गाठत भारत याला अटक केली़ त्याने चोरीची कबुली सुध्दा दिली आहे.याप्रकरणाचा पुढील तपास संजय भोई हे करीत आहेत. भारत हा अट्टल चोरटा अनिल कुकरेजा याचा मुलगा असून अनिल यास चोरीच्या गुन्ह्यात हद्दपार करण्यात आले आहे.