जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चक्क स्कॉर्पिओमधून गुरांची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरातून बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ या वाहनावर शहर पोलिसांनी कारवाई केली असून या वाहनातून कोंबण्यात नेण्यात आणणाऱ्या ५ गायींची मुक्तता करण्यात आली आहे.
याबाबत अधिक मााहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळून एम.एच. ११ ए.के.६००९ या क्रमाकांच्या स्कॉर्पिओतून गुरांना कोंबून त्याची वाहतूक केली जात असल्याची पोलीस नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर उन्हाळे, योगेश इंधाटे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. याठिकाणी गुरांनी भरलेले वाहन सोडून चालक पसार झाला होता. पोलिसांनी हे वाहन शहर पोलीस ठाण्यात आणले. वाहन जप्त करण्यात येवून वाहनातील ५ गायींची मुक्तता करुन त्या गायींना पांझरापोळ येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर उन्हाळे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.