जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र आणि आशा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २२ ते २६ मे दरम्यान १३ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ‘मला काही बोलायचंय’ हे आगळं-वेगळं निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या शिबिरात मुलांना वेगवेगळ्या समाज जीवनाशी निगडीत व महत्वाच्या विषयांवर आपले मत मांडून व्यक्त होण्याची संधी दिली जाणार आहे. ‘देव आहे की नाही?’, ‘सोशल मिडियाबद्दल मत काय?’, ‘कुटुंब व्यवस्था भारतीय संस्कृतीची उपलब्धी आहे’, ‘१० वर्षांनी मी कुठे असेल?’, ‘२०३० साली भारत कुठे असेल?’, ‘बेरोजगारी म्हणजे काय असते?’ अशा विषयांवर त्यांना मते मांडण्याची संधी मिळेल. या शिबिरात कुणीही मुलांना भाषणबाजी करून शिकवणार नसून त्यांनाच गट चर्चेतून आपली मते व्यक्त करायला मिळणार आहेत. या शिबिराला पालकांनी आपल्या पाल्यांना मोठ्या संख्येने आवर्जून पाठवावे, असे आवाहन आयोजक आशा फौंडेशनचे संचालक गिरीश कुलकर्णी यांनी केले आहे.