जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव स्वर्णनगरी आणि अध्यात्मभूमीत जयगच्छाधिपति 12 वे पट्टधर आचार्य प्रवर 1008 प. पु. श्री पार्श्वचंद्रजी म.सा. आदी ठाणा 7 यांचा भव्य ऐतिहासिक चातुर्मास मंगल प्रवेश उद्या शनिवार दि. 9 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता उत्साहात होणार आहे.
गणपती हॉस्पिटल शेजारी असलेल्या डॉ. शीतल व संदीप ओस्तवाल यांच्या घरापासून ते स्वाध्याय भवन अशी भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. या शोभायात्रेत मंगल कलशधारी महिला, बालक आणि विविध जैन समाजातील संस्था, मंडळ सदस्य उपस्थित राहणार आहेत. पुरुषांनी पांढरा पोशाख तर महिलांसाठी पिंक/ गुलाबी साडी असा ड्रेसकोड आहे. या वर्षाचा चातुर्मास जयगच्छाधिपति उग्र विहारी, वचन सिद्ध साधक, व्याख्यान वाचस्पति, आशुकवि आचार्य प्रवर श्री पार्श्वचंद्र जी म.सा., एस. एस. जैन समणी मार्ग चे आरंभकर्ता, अणुप्पेहा ध्यान प्रणेता, प्रवचन प्रभावक डॉ. श्री पदमचंद्र जी म.सा., मधुर व्याख्यानी श्री जयेंद्र मुनि जी म.सा ., सेवाभावी श्री जयशेखर मुनिजी म.सा., मौनसाधक श्री जयधुरन्धरमुनि जी म.सा., विद्याभिलाषी श्री जयकलशमुनि जी म. सा., सेवाभावी श्री जयपुरन्दरमुनि जी म.सा. या जैन संतवृंदांचा सहभाग असणार आहे. चातुर्मास काळात धार्मिक आराधना, जप-तप, विविध धार्मिक स्पर्धा, प्रेरक प्रवचने, धर्मचर्चा तसेच अनेकविध धार्मिक अधिष्ठान संपन्न होतील. या चातुर्मास पर्वात देशातील विविध राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनार्थ येतील असा कयास आहे. ‘जय परिसर’, स्वाध्याय भवन, गणपतीनगर, आकाशवाणी चौकाजवळ, जळगाव येथे संपन्न होणाऱ्या या चातुर्मास सोहळ्यासाठी स्थानिक, परिसरातील, जिल्ह्यातील श्रावक-श्राविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सेवादास दलूभाऊ जैन व कस्तुरचंद बाफना यांनी केले आहे.