मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | क्रांतीवीर भगतसिंग यांना फाशी दिल्यानंतर ब्रिटीशांना जसा आनंद झाला, तसाच राज्यपालांना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यावर झाला. याच आनंदाच्या भरात त्यांनी शिंदेंना पेढा भरविला अशा शब्दांमध्ये शिवसेनेने आज विरोधकांसह राज्यपालांना टार्गेट केले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये आज सद्यस्थितीतल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. यात पहिल्यांदा राहूल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. नार्वेकर यांना कुठे टांग टाकायची हे चांगलेच माहित आहे. याचमुळे ते शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपमार्गे विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्याची मल्लीनाथी यात करण्यात आलेली आहे. तर शिंदे गटाचे आमदार हे बाळासाहेबांचा जयघोष करत असले तरी त्यात काहीच दम नसून ते उसने अवसान आणत असल्याची टीका यात करण्यात आलेली आहे.
या अग्रलेखात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील लक्ष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्षपदाची निवड ‘हेड काऊंट’ पद्धतीने झाली, पण महाविकास आघाडी सरकारला तशी परवानगी नव्हती. त्यावेळी गुप्त मतदान त्यांना हवे होते. मग राज्यपालांच्या हातातील संविधानाचे पुस्तक नक्की कोणाचे? डॉ. आंबेडकरांचे की अन्य कोणाचे? त्यांच्या हातातील न्यायाचा तराजू हा सत्याचा की सुरतच्या बाजारातला? हा प्रश्न मराठी जनतेला पडला आहेच.
महाराष्ट्रातले ठाकरे सरकार गेल्याचा म्हणजे हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे सरकार पायउतार झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झाला. क्रांतिवीर भगतसिंगास लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात ब्रिटिशांनी फाशी दिली त्यावेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला असेल तसा राज्यपालांना झालेला दिसला. याच आनंदातून त्यांनी एकनाथ शिंदे यांना पेढा भरवल्याची टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे. तर ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पेढा भरवला नव्हता. कदाचित राजभवन परिसरातील पेढ्यांची दुकाने बंद पडली असावीत असा खोचक टोला देखील यात मारण्यात आला आहे. सध्याचे दिवस कठीण असले तरी ते निघून जातील असा आशावाद देखील यात व्यक्त करण्यात आलेला आहे.