जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांच्या दहा जागांच्या निवडणूकी संदर्भात आज सहविचार सभा संपन्न झाली. या सभेत विविध सूचना करण्यात आल्या.
आज बुधवार, दि.२९ जून रोजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध पदवीधर विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी तसेच इतर शिक्षणप्रेमी नागरिक यांच्यासमवेत सहविचार सभा संपन्न झाली. या सभेच्या प्रारंभी निवडणूक कक्षाचे विभाग प्रमुख डॉ.एस.आर.भादलीकर यांनी पदवीधर नोंदणीची सविस्तर माहिती दिली. यापूर्वीच्या मतदारांना मतदार नोंदणीचे नुतनीकरण करावे लागेल तसेच नवीन पदवीधरांना मतदार नोंदणी करावी लागेल. त्यासाठी अर्ज ऑनलाईन उपलब्ध् करुन दिला जाईल. मतदार नोंदणीसाठी कोण पात्र आहेत याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी काही सूचना केल्या. त्यामध्ये नोंदणी प्रक्रिया ऑफलाईन देखील ठेवावी या व इतर काही सूचना केल्या. अध्यक्षीय समारोपात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यापीठाची अधिसभा हे सर्वोच्च अधिकार मंडळ आहेत. यातूनच नेतृत्वाची प्रक्रिया घडते असे सांगून ही संपूर्ण प्रक्रिया विद्यापीठाकडून पारदर्शीपणे राबविली जाईल असे सांगितले.
जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले. यावेळी मंचावर विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ.पवार हे उपस्थित होते.