जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उमाळे येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाच्या शेतात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करून आदिवासी भिल्ल कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “तालुक्यातील उमाळा येथील सुनिता बापू भिल हि माहिला आपल्या दोन मुले आणि मुलीसह वास्तव्याला आहे. ते मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. देव्हावरी शिवारातील गट नंबर ६/२ मध्ये सुनिता भिल यांचे नावे शेत आहे. यापूर्वी हे शेत सुनिता भिल यांच्या वडीलांच्या नावे असल्याने त्यांनी गावातील महेश मनोहर पाटील याला शेती करण्यासाठी दिली होती.
दरम्यान, वडील मयत झाल्याने शेती सुनिता भिल नावावर करण्यात आली. गुरुवार, दि. २३ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी आले असता महेश पाटील आणि एक ट्रॅक्टर चालक विकास बुआ तेथे आला व ही शेती आमची आहे असे सांगून दमदाटी करू लागला. त्यावर “शेती तुझ्या नावावर आहे. असा उतारा आणून दाखव.” असे सांगितले. याचा राग असल्याने दोघांनी महिलेला शिवीगाळ व मारहाण केली तर महिलेचा मुलगा ज्ञानेश्वर आणि मुलगी नंदीनी यांनी देखील दोघांवर दगड फिरकावला. दोघेजण पळून गेले.
याबाबत एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी याची सखोल चौकशी करून भिल कुटुंबाला न्याय देण्यात यावा. अशी मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली आहे.