मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या विधानपरिषद निवडणुकीत विजय संपादन केला आहे. यामुळे गेल्या सुमारे पावणे तीन वर्षानंतर नाथाभाऊंची विधीमंडळात एंट्री होणार आहे.
विधानसभा सदस्यांमधून निवडून जाणार्या जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असल्याचे जाहीर होताच यासाठी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. यातच १० जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा फटका बसल्याने महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला. खरं तर बहुतेक वेळेस या निवडणुका बिनविरोध होत असतात. तथापि, भाजपने आपला पाचवा उमेदवार मैदानात उतारल्याने चुरस वाढली.
भाजपतर्फे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली. शिवसेनेतर्फे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, कॉंग्रेसतर्फे चंद्रकांत हंडोरे व भाई जगताप यांना तिकिट मिळाले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे यांना तिकिट मिळाले. आकड्यांचा खेळ पाहता भाजपचे चार, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर कॉंग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र दहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली. यात भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारात काटे की टक्कर होणार असल्याचे संकेत मिळाले. तथापि, याऐवजी एकनाथराव खडसे यांचा गेम करण्याची रणनिती समोर आली. भाजप नेत्यांनी सर्व पक्षांमधील खडसे विरोधकांशी हातमिळवणी करण्याची रणनिती आखली. यामुळे राष्ट्रवादी आणि स्वत: एकनाथराव खडसे यांनीही आपल्या परीने मोर्चेबांधणी केली.
दरम्यान, निवडणुकीआधी चारही पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षीत जागी ठेवले. तसेच लहान पक्ष व अपक्षांना आपलेसे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पडद्याआड खूप नाट्य रंगल्यानंतर सोमवारी विधानपरिषद निवडणुकीसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदान झाले. यानंतर सायंकाळी ५ वाजता याची मतमोजणी सुरू झाली. कॉंग्रेसने भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने मतमोजणी रखडली. यानंतर सायंकाळी सुमारे सात वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाली. यात एकनाथराव खडसे यांना 27 मते मिळून ते विजयी झाले. गेल्या सुमारे पावणे तीन वर्षांपासून राजकीय विजनवासात असणार्या एकनाथराव खडसे यांना या विजयामुळे दिलासा मिळाला असून त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे.