मोठी बातमी : राज्यात पुन्हा मास्क सक्ती !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागली असतांना राज्यात पुन्हा मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह अन्य काही आदेश जारी केले आहे.

या निर्देशानुसार आता रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकार्‍यांना कोरोना चाचण्या वाढवण्यास सांगितलं आहे.  वारंवार सूचना देऊनही राज्यातील चाचण्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. १ जूनच्या आकडेवारीनुसार, २६ जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार्‍या साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येत मोठी कमतरता आहे. ही चिंतेची बाब असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांचं प्रमाण तत्काळ वाढवावं’, असं पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान मास्क वापरण्याचं केवळ आवाहन करण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आरोग्य सचिवांनी काढलेल्या पत्रकामध्ये मास्क घालणं हे मस्ट असं म्हटलं आल्यानं राज्यात मास्कसक्ती करण्यात आल्याचा सर्वांचा समज झाला. पण हा मस्ट शब्द सक्ती असा न वाचता केवळ मास्क वापरण्याचं आवाहन असा वाचून मीडियानं लोकांना सांगावं. त्यामुळं मास्क नसल्यास कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Protected Content