जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजनेत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार घोटाळ्याची उच्चस्तरीय समिती नेमणूक करून चौकशी करण्यात यावी, या मागण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या वतीने बुधवारी २५ मे रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे.
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजनेत अंतर्गत २०१९ ते २०२२ दरम्यान शेतकऱ्यांना दिलेले शेती साहित्य यात शेडनेट हाऊस, हरितगृह, ठिबक सिंचन, कंट्रोल पॅनल, इलेक्ट्रॉनिक मोटर, पाण्याची टाकी, पीव्हीसी पाईप आदी साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून बिले मात्र आयएसआय मार्कच्या दरात आणि जीएसटी लावून संबंधित कंपनी व एजंट यांनी शासकीय अधिकार्यांच्या संगनमताने गोलमाल करून रेकॉर्ड तयार केला. यात शेतकरी व शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा रकमेचा अपहार केल्याचे उघडकीला आले आहे. दरम्यान उच्चस्तरीय समिती नेमून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि घोटाळ्यातील रक्कम त्यांच्याकडून व्याजासह आणि दंड वसूल करावे या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेने बुधवार २५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
याप्रसंगी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास राजपूत, घनश्याम काळे, भीमराव बडगुजर, शिवाजी पाटील, रवींद्र पाटील, अरुण सपकाळे, संतोष वंजारी, प्रेमराज पळशीकर, पंढरीनाथ अहिरे, मिराबाई राऊत, दर्शना बडगुजर, रामचंद्र पाटील यांच्यासह आदी सदस्य उपस्थित होते.