तालुक्यातील शिरागड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पथराळे गावालगत असलेली गावठानच्या क्षेत्राची जागा ही शासनाकडे वर्ग करण्यात आली आहे. गावातील काही नागरीकांनी या ठिकाणी सदरच्या जागेवर ताबा घेतला असुन ती जागा सोडत नसल्याने गावाच्या विविध विकास कामांना जागेअभावी मोठ्या अडचणी निर्माण झाल्याची लिखित तक्रार शिरागड ग्रामपंचायतच्या सरपंच योगिता सोनवणे यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल तहसीलदार, यावल गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात शिरागड तालुका यावल येथील सरपंच योगिता प्रताप सोनवणे व ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या लिखित तक्रार निवेदनात म्हटले आहे की, “शिरागड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पथराळे गावालगतच्या गट क्रमांक ४५ हे क्षेत्र शासनाने सरकार गावठानकडे वर्ग म्हणून नोंद केलेली आहे; परन्तु थोरगव्हाण या गावातील काही ग्रामस्थांनी यावर शेती करून ताबा घेतलेला आहे . ‘पथराळे’ या गावात महीला व पुरुषांसाठीच्या सार्वजनिक शौचालय, तरूणांसाठी व्यायामशाळा व सभा मंडप आदी विकासकामे करावयाची आहे. मात्र गावात आज रोजी मोकळी जागा नसल्याने जागेअभावी करता येत नसल्याचे तक्रार निवेदनात म्हटले आहे.
आज रोजी शिरागड ग्रामपंचायतकडे प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची प्राप्त झाली असून यात पथराळे गावातील देखील लाभार्थ्यांच्या यादीत समावेश आहे . घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेली जागा नसल्याने लाभार्थ्यांना घरकुलच्या योजनेपासून वंचित राहावे लागणार की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .पथराळे गावातील गट क्रमांक४५ची गावठान जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात मिळाल्यास या ठिकाणी घरकुलच्या लाभार्थ्यांना लाभ मिळून गावातील विविध विकास कामांना चालना मिळेल.
तरी प्रशासनाने सदरची जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळवून द्यावी. अशी मागणी तहसीलदार महेश पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडे केली आहे.
यावलचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांना दिलेल्या निवेदनावर सरपंच योगिता सोनवणे यांच्या स्वाक्षरी असुन या मागणीला प्रताप सोनवणे, सुर्यभान पाटील, वसंत सोनवणे, यशवंत सोनवणे, बाळु सोनवणे, दिनकर सोनवणे यांनी आपला पाठींबा दिला आहे.