भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अविश्वासू आणि कपटी प्रवृत्तीने समाजमन धोक्यात येते. शांती आणि प्रेमानेच परस्परांत निखळ मैत्री भाव निर्माण होतो. तथागत बुद्धांच्या शांती आणि मैत्रीच्या मार्गाने गेल्यास जग दुःख मुक्त होऊन प्रगतीच्या शिखरावर पोहचेल.” असे प्रतिपादन प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जे.पी.सपकाळे यांनी केले.
प्रागतिक विचार मंचने आयोजित केलेल्या “बुद्ध जयंतीच्या निमित्ताने” (वैशाखी पौर्णिमा) आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. आपले मनोगत व्यक्त करतांना सपकाळे पुढे म्हणालेत की,” बुद्धांनी जगाला आपल्या तत्वज्ञानातून दुःख मुक्तीचा मार्ग देऊन शांती आणि प्रेमाचे अनमोल विचार दिलेत. या विचारांची वर्तमानात व्यक्ती व समाजाला आज नितांत गरज आहे. स्वार्थी आणि कपटी प्रवृत्तीने समाजमनावर असुरक्षित आणि भयग्रस्त वातावरण निर्माण केल्याने अनेक मानसिक आजारांनी लोक त्रस्त आहेत. या सर्वांवरती तथागत बुद्धांचे मानवतेचे विचारच या सृष्टीला तारू शकतात. बुद्ध हे विज्ञान व विवेकाचे प्रतिक आहेत. ही विचारधारा जगाचे कल्याणकारी विचारधारा आहे. तिला आत्मसात करून कृतीत आणल्यास व्यक्तीचे जीवन आनंददायी होते .त्यासाठी बुद्धांच्या विचारांच्या मार्गाचे कृतिशील पाईक व्हा.” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास प्रा.डॉ.जतिन मेढे, सावळे, मुख्याध्यापक अशोक बाऱ्हे, अनिल बागुल, प्रा.प्रशांत नरवाडे, देवेंद्र तायडे, प्रशांत तायडे, संघरत्न सपकाळे, निलेश रायपुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समाधान जाधव यांनी केले.