जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हमालांना कमी पैसे देवून मालकांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याची तक्रार केल्याचा रागातून मालधक्क्यावरील मुकादमावर चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजू बिसमिल्ला पटेल (वय-४७) रा. राजमालती नगर, दुधफेडरेशन रोड जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. जळगाव रेल्वेस्टेशनवरील माल धक्क्यावर मुकादम म्हणून कामाला आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी १४ मे रोजी कामावरून दुपारी १ वाजता घरी जेवणासाठी गेले. त्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास राजू पटेल यांना एकाला फोन आला की मालधक्क्यावर भांडण सुरू आहे तुम्ही माल धक्क्यावर येण्याचे सांगितले. त्यानुसार पटेल हे लागतीच मालधक्क्यावर गेले. मालधक्क्यावर हमालांना कमी पैसे देवून मालकांकडून जास्तीचे पैसे घेत असल्यााची तक्रार राजू पटेल यांनी माथाडी मंडळाकडे केली होती. या तक्रारीच्या रागातून छोटू बाविस्कर व इतर सात ते आठ जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यात छोटू बाविस्कर याने हातील चॉपरने पटेल यांच्या पायावर वार करून गंभीर जखमी केले. घटना घडल्यानंतर राजू पटेल यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात आबा बाविस्कर, छोटू बाविस्कर आणि इतर ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.