अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोरोनाच्या आपत्तीमुळे दोन वर्षांपासून न भरलेली येथील संत सखाराम महाराज यांची यात्रा यंदा मोठ्या उत्साहात अक्षय तृतीयेपासून सुरू झालेली आहे.
अक्षय तृतीयेपासून संत सखाराम महाराज यांचा यात्रोत्सव सुरू होतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा भरलेली नव्हती. यंदा मात्र निर्बर्ंध उठलेले असल्याने भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला. या यात्रोत्सवाला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर स्तंभरोपण व ध्वजारोहणाने प्रारंभ झाला.
संत श्री प्रसाद महाराज, आमदार अनिल पाटील यांच्यासह माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी, संचालक डॉ.अनिल शिंदे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, सुभाष चौधरी आदी मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.
भाविक वाडी संस्थांनच्या मंदिरात दाखल झाल्यानंतर आधी विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर पूजन होऊन सकाळी साडेनऊ वाजता संत प्रसाद महाराजांचे वाजतगाजत नदीपात्रात आगमन झाले. समाधीसमोर आधी अन्नपूर्णा पूजन झाल्यानंतर सुरवातीला ध्वजारोहण व त्यानंतर स्तंभरोपण करण्यात आले. पौरोहित्य व स्तंभरोपण केशव पुराणिक, प्रशांत जोशी, अभय जोशी, जय देव यांच्याहस्ते झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.