जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा विद्याप्रसारक प्रकरणाच्या संदर्भात विजय पाटील यांच्या जिल्हा न्यायालयाने मंजूर केलेल्या रिव्हीजन अर्जाच्या विरोधातील निलेश भोईटे यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत या संस्थेत पाटील आणि भोईटे या दोन्ही गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. २०१८ मध्ये मविप्रच्या ताब्यावरून हे वास विकोपाला गेले. सहकार कायद्याने निवडणूक घेऊन निवडून आल्याने पाटील गट तर धर्मदाय कायद्यानुसार नोंदणीचा आधार घेऊन भोईटे गटाने संस्थेच्या ताब्यावर दावा केला होता. तत्कालिन तहसीलदारांनी घेतलेल्या सुनावणीनंतरही हे प्रकरण स्पष्ट झाले नव्हते. अखेर खंडपीठाच्या आदेशात जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन पाटील गटाच्या बाजुने जिल्हा न्यायालयाने निर्णय दिला होता.
या निकालाच्या विरोधात निलेश भोईटे यांनी खंडपीठात दाद मागितली. त्यावर न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने भोईटेंची याचिका फेटाळली. त्यामुळे संस्था पाटील गटाच्या ताब्यात असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, खंडपीठाच्या निकालानंतरही सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी भोईटेंनी मुदत मागीतली होती. ही मागणी मान्य करत न्यायालयाने भोईटे यांना सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. यामुळे आता भोईटे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.