जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र दिनी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.
रविवार, दिनांक १ मे, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमानिमित्त सकाळी ८ वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा यांचे हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
या कार्यक्रमास सर्व लोक प्रतिनिधी, स्वातंत्र सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई – वडील आणि कोरोनायोध्दा नागरिक आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे, यासाठी दिनांक १ मे, २०२२ रोजी सकाळी ७.१५ ते ९ च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, जर एखादया कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावासा वाटल्यास त्यांनी तो सकाळी ७.१५ च्या पूर्वी किंवा सकाळी ९ वाजेच्या नंतर आयोजित करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळविले आहे.