पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माझे लग्न असल्याची बतावणी करून एकाला तुमच्या अंगठी सारखी अंगठी बनवायचे असल्याचे सांगत २१ हजाराची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की, विरभान भिकन पाटील (वय-४७) रा. जोगलखेडा ता. पारोळा हे कामाच्या निमित्तानं १० एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पारोळा नगरपालिका चौकात आले. चौकात भाजीपाला घेत असताना त्याठिकाणी अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला व म्हणाला की, मी तुम्हाला चांगला ओळखतो, माझे लग्न आहे, मला तुमच्या बोटातील अंगठी सारखी अंगठी बनवायचे आहे, तुम्ही मला अंगठी काढून दाखवा. त्यानुसार विरभान पाटील यांनी अंगठी काढून दिली त्यावर मी सोनाराला दाखवून देतो असे सांगून तो अंगठी घेऊन निघून गेला. बराच वेळ झाला तो परत आला नाही. म्हणून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत विरभान पाटील ११ दिवसानंतर पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक योगेश जाधव करीत आहे.