जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील आकाशवाणी चौकातील सर्कलला विरोध होऊन देखील तो उभारण्यात आल्याने भीषण अपघातांची शक्यता वर्तविण्यात येत असतांनाच आता एक वाहनच यावर चढल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.
जळगाव शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आलेले आहे. यात गुजराल पेट्रोल पंप चौक आणि प्रभात चौकात उड्डाण पुल घेण्यात आले असून याच्या पुढे आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौक या तिन्ही प्रमुख चौकांमध्ये मोठे सर्कल उभारण्यात आले आहे. या सर्कलमुळे वाहतुकीची कोंडी होत असून यामुळे वाहनांना अपघात होण्याची शक्यतादेखील असल्याने याला प्रखर विरोध करण्यात आला. तथापि, प्रशासनाने याला न जुमानता सर्कल उभारले असून यामुळे अपघातांना निमंत्रण मिळाले आहे.
दरम्यान आज भरधाव वेगाने धावणार्या पिकअप व्हॅनच्या चालकाला अचानक समोर सर्कल असल्याचे न दिसल्याने हे वाहन थेट सर्कलच्या कठडे तोडून वर चढल्याचे दिसून आले. यात चालकाला दुखापत झाली आहे. यामध्ये सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी आगामी काळात भीषण अपघाताची शक्यता असल्याने या सर्कलबाबत काही तरी निर्णय घ्यावा. अन्यथा येथे किमान धोक्याची सूचना तरी ठळकपणे लावावी अशी मागणी आता होत आहे.