जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून तापमानाचा आलेख काहीसा कमी जास्त प्रमाणात आहे. आगामी दोन ते तीन दिवस राज्यातील तापमान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात पुन्हा उन्हाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकानी वर्तवला आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्याच्या सुरवातीपासूनच हवामान कोरडे होते. तर जिल्ह्यात मार्च अखेरीस हवामान विभागाने देखील उष्णतेची लाट येणार असल्याचे संकेत दिले होते. आणि एप्रिलच्या सुरुवातीलाच जिल्ह्याचे तापमानाने ४२ अंशाच्यावर टप्पा गाठला होता. या सप्ताहात जिल्ह्यातील कमाल तापमानात गेले तीन दिवस किंचित घट दिसून येत होती. मात्र, जिल्ह्यांत बऱ्याच ठिकाणी तापमान ४२ अंश दरम्यान असले तरी हवामान कोरडे असल्याने उन्हाचा तडाखा जाणवून येत आहे. येत्या दोन तीन दिवसात रविवार, सोमवार आणि मंगळवारी राज्यभरात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने उन्हाचा तीव्रता अधिकच जाणवणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे.
वाढत्या तापमानामुळे शुकशुकाट
जिल्ह्यात तापमानाचा पारा काही ठिकाणी ४२ ते ४४ अंश दरम्यान असला तरी सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवून येत आहे. त्यामुळे शहरात दुपारच्या वेळी बहुतांश ठिकाणी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. शनिवार सरासरी तापमान कमाल ४२ तर किमान २४ अंश दरम्यान असून हवेतील आर्द्रता २९ टक्के असून हवामान कोरडे असल्याने उष्णता जास्त प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे.