जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जळगाव- पाचोरा दरम्यान ५५ ते ६० कि.मी. रस्ते विकास कामात ठिकठिकाणी अडथळे आलेले असल्याने काँक्रीटीकरण ठिकठिकाणी अपूर्ण आहे. जळगाव ते पाचोरा दरम्यान काँक्रीटीकरण रस्त्यावरील अपूर्ण असलेल्या कामामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या तीन वर्षापूर्वी जिल्ह्यात तरसोद ते फागणे, जळगाव ते मनमाड पूर्वीचा जळगाव पाचोरा राज्य मार्ग, आणि औरंगाबाद अशा रस्ते मार्गाचे विस्तारीकरण, काँक्रीटीकरण, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून संगोपन करणे आदि कामे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ अर्थात ‘नही’ अंतर्गत सोपविण्यात आली. त्यात जळगाव पाचोरा राज्य मार्ग क्रमांक १८९ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नहीकडे जे- ७५३ नुसार जळगाव -मनमाड दरम्यान हस्तांतरित करण्यात येऊन रस्ते मार्गाचे विस्तारीकरण, काँक्रीटीकरण बहुतांश ठिकाणी पूर्ण करण्यात आले आहे.
परंतु जळगाव शहर महानगरपालिका हद्दीपासून ते रायसोनी महाविद्यालय, रामदेववाडी ते वावडदा, वावडदे पुलापासून ते वडली, वडली ते पाथरी, पाथरी ते सामनेर, नांद्रा खेडगाव दरम्यान ठिकठिकाणी १.५० ते २ किलोमीटर चे अंतरावरील तुकडे काँक्रीटीकरण काम अपूर्ण आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीचे अधिग्रहणावरून वाद असल्याच्या नावाखाली हे रस्ते काम अपूर्ण आहे.
या अपूर्ण रस्तेकामामुळे या तुकड्याचा ठिकाणी डांबरीकरण देखील होत नसल्याने मोठमोठे खड्डे निर्माण होऊन वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. नही कडून करण्यात येणाऱ्या या रस्तेकामात ठिकठिकाणी टक्केवारी मागितली जात असल्याची तक्रारदेखील सुरुवातीला केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केली होती, त्यांनतर रस्तेकाम तुकडे अपूर्ण ठेवून उर्वरित कामे पूर्ण करून ठेकेदाराने पाचोरा तालुक्यातील गोराडखेडे आणि नगरदेवळा येथील सिमेंट मिक्सर प्लांट हलविला. त्यांनंतर या रस्तेकामाचे काम अपूर्ण असून रस्त्याची अधिकच दुर्दशा झाली आहे. या अपूर्ण कामावर किमान डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातून केली जात आहे.