जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील २४ वर्षीय तरूणीने भावी पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली होती. दरम्यान, पोलिसांकडून दोषींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावे, असे मागणीचे निवेदन मयत तरूणीच्या कुटुंबीयांनी बुधवारी ३० मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ तालुक्यातील कुपानाचे येथील मुलगी रामेश्वरी रवींद्र नागपुरे (वय-२४) हिचा साखरपुडा ६ मार्च रोजी भुषण ज्ञानेश्वर पाटील रा. रावेर ह.मु. नाशिक याच्याशी झाला होता. दरम्यान भावी नवरा मुलगा भुषण याने वेळोवेळी रामेश्वर हिला फोन करून मानसिक त्रास देत होता. तसेच “हुंडा वाढवून देणे, तु अडाणी आहे, तू जाड आहे, तू मला नापसंत आहे, मी लग्न मोडणार” अशी दमदाटी व धमक्या देत होता. एवढ्यावरच न थांबता मुलीच्या वडीलांना रावेर येथे बोलावून १० ग्रॅमची अंगठी काढून घेतल्या. आणि कुणाला सांगू नको असे सांगून दम दिला. दरम्यान या छळाला कंटाळून रामेश्वरी या तरूणीने २५ मार्च रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती.
मयत मुलीचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला होता. दरम्यान संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत संबंधितांवर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन मयत रामेश्वरी या तरुणीचे नातेवाईक यांनी बुधवार ३० मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांना दिले.
या निवेदनावर नीता बारी, उषा अहिरे, संगीता बारी, मंगला बारी, निर्मला बारी, संगीता बारी, कविता बारी, रूपाली पाटील, सावित्रीबाई पाटील, दीपिका कोथळकर, जिजाबाई बारी, जयश्री बारी, कविता आस्वार, सुनिता अस्वार, मालती भारी, मंगला धनगर, अंजना वराडे, सुनिता पाटील, विमलाबाई बारी यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.