यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील शाळेत शाळकरी मुलीचा फोटो काढून दोन जणांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुलगी ही गावातील शाळेच्या पायरीवर बसलेली असतांना गावातील दोन अल्पवयीन विद्यार्थी आले. यापैकी एकाने हात पकडला आणि दुसऱ्याने फोटो काढला. त्यानंतर तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. आपल्यावर झालेला अतिप्रसंग अल्पवयीन मुलीने पालकांना कथन केला. पिडीत मुलीसह कुटुंबियांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून दोन्ही अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण करीत आहे.