भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जामनेर रोडवर प्राचीन काळापासून पोटलीवाले बाबा यांचा दर्गा आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षापासून एक वडाचे झाड आहे. हिंदू मुस्लिम बांधव या झाडाची पूजा करतात. मात्र काही समाजकंटकांनी नेमके हेच वडाचे झाड तोडल्यामुळे हिंदू मुस्लिम बांधवांनामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
जामनेर रोड वर हिंदू-मुस्लिम बांधवाचे एकात्मतेचे प्रतीक म्हणून पोटलीवाले बाबा यांचा दर्गा प्रसिद्ध आहे. याठिकाणी सर्वधर्मीय लोक मोठ्या भक्तिभावाने पूजाअर्चा करण्यासाठी तसेच पोटलीवाले बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी हिंदू स्त्रिया या झाडाची पूजा करतात. तसेच मुस्लिम स्त्रिया देखील या झाडाचे दर्शन घेतात. मात्र चाळीस वर्षापासून असलेले वडाचे झाड कोणतीही परवानगी न घेता काही समाजकंटकांनी तोडल्यामुळे सर्वधर्मीय लोकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच झाड तोडणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मौलाना यांच्यासह नागरिकांनी केली आहे.