बोदवड प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर आज नगराध्यक्षपदासाठी खुला सर्वसाधारण प्रवर्ग निघाल्याने नगराध्यक्षपदासाठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.
बोदवड नगरपंचायतीची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडली. यानंतर लागलेल्या निकालातून शिवसेनेने नऊ जागा पटकावत स्पष्ट बहुमत संपादन केले. राष्ट्रवादीला सात तर भारतीय जनता पक्षाला एक जागा मिळाली. यामुळे शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या अनुषंगाने आज मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत बोदवड येथील नगरपंचायतीसाठी सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण निघाले आहे.
बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेचे सईद बागवान आणि आनंदा रामदास पाटील हे दोन उमेदवार खुल्या प्रवर्गातून निवडून आले आहेत. यामुळे आता नगराध्यक्षपदी या दोन्ही उमेदवारांपैकी कुणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.