अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील वाघोदे येथे शुक्रवारी मापात पाप करणाऱ्या कापूस व्यापाऱ्याला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. गावकऱ्यांची फसगत करणाऱ्या त्या व्यापाऱ्यास गावकऱ्यांनी चोप देत त्यास ५० हजारांचा दंड केला.
शुक्रवारी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान एक तरुण व्यापारी हात काटा व लहान गाडी घेऊन गावातच कापूस खरेदीसाठी आला. शेतकऱ्यांचा फडदड कापूस तसेच चांगला कापूस देखील साडे आठ हजार रुपये क्विंटल भावाने खरेदी करेल असे सांगितल्याने साहजिकच चांगला मोबदला मिळणार म्हणून काही शेतकऱ्यांनी त्याला कापूस देण्याचे ठरवले .हात काटा इलेक्ट्रॉनिक काटा असल्याने व्यापाऱ्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कापूस देण्याचे ठरवले. एक विधवा महिला भारतीबाई रामकृष्ण पाटील हिने आपला कापूस देण्याचे ठरवले. गावातीलच रावसाहेब युवराज पाटील या शेतकऱ्याला मोजणीच्या ठिकाणी बसवले. कापूस मोजता मोजता पोत्यात भरलेला कापूस जेव्हा मोजला जाऊ लागला तेव्हा प्रत्यक्ष कापूस जेव्हा मोजला जात होता तेव्हा त्याच्या वजनापेक्षा कमी नोंद काट्यावर दाखवत असल्याची बाब रावसाहेब पाटील यांच्या लक्षात आली. स्वतः आधी मोजलेला कापूस कमी भरत आहे याचा अर्थ फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी व्यापाऱ्याला जाब विचारायला सुरुवात झाली.
त्या व्यापाऱ्याला त्याच्या गावाचे नाव विचारताच विसंगती आढळून आले.आधी अंचाळे मग चिंचखेडा असे सांगितले. त्याच्याकडे आय डी पुरावा मागितला व नाव विचारले असता तो वेगवेगळी नावे सांगू लागला. तोपर्यन्त गावकऱ्यांची गर्दी जमली. संतप्त गावकऱ्यांनी व्यापाऱ्याला घेरले. यावेळी काही तरुणांनी त्याला कानाशिलात लगावल्याने तो गया- वया व हात जोडून माफी मागू लागला. कोणी काय कोणी काय सांगत असताना सरपंच चेतन पाटील, जयप्रकाश पाटील, किर्तीलाल पाटील, संभाजी चिंधा पाटील, रावसाहेब पाटील, सतीश पाटील, चतुर पाटील, किरण पाटील, सोनू भिल, लक्ष्मण भिल आदींनी सामंजस्याची भूमिका घेत यापुढे हा नालाईक व्यापारी कोणाचीही फसगत करणार नाही म्हणून त्याला ५० हजार रुपये दंड करण्याचे ठरवून या घटनेस पूर्णविराम देण्यात आला.