यूपीत भाजपच्या दुसर्‍या मंत्र्याचा पक्षाला जय श्रीराम !

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी धक्का बसला असून स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पाठोपाठ दारासिंह चौहान या मंत्र्यांनी पक्षाला रामराम ठोकून समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.

कालच योगी सरकारमधील श्रम मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देऊन समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. आता आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान  यांनी योगी सरकारला रामराम केला आहे. २४ तासांत भाजपसाठी हा दुसरा धक्का आहे. दारा सिंह चौहान समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत आहे. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दोन दिवसांत दोन मंत्री आणि चार आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला अखिलेश यादव यांच्याकडून कडवे आव्हान मिळत आहे.

काल मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परत फिरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी भाजपला सोडलं आहे. पुन्हा परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही मौर्य यांनी म्हटले आहे. यानंतर आता पुन्हा एका मंत्र्यांने पक्षाचा त्याग केल्याने भाजपला यंदा तगडे आव्हान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

Protected Content